एकदिवसीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा
व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख बाह्य रूपात नसून आपल्या विचारांत, वर्तनात आणि कार्यनिष्ठेत : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्यावतीने “व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा” संपन्न
व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख बाह्य रूपात नसून आपल्या विचारांत, वर्तनात आणि कार्यनिष्ठेत असते त्यामुळे मेंदू, हृद्य आणि हात या त्रिसूत्रीचा अंगीकार करून कोणत्याही विभागात काम करताना ते केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर मनापासून करा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.प्रवीण दवणे यांनी केले. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्यावतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या “एकदिवशीय व्यक्तिमत्त्व विकास” कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेला सचिव कल्पना जगताप, वित्त नियंत्रक कांचन तावडे, उपमुख्य अभियंता राजकुमार पवार, समन्वयक नितीन पवार, सक्षम प्राधिकारी अश्विनी सुर्वे -पाटील, सक्षम प्राधिकारी मिनल पालांडे, कार्यकारी अभियंता सलीम सय्यद, सहाय्यक संचालक नगर रचना अशोक रायमाने, मुख्य विधी सल्लागार ऍड.सुमन प्रसाद, जेष्ठ विधिज्ञ ऍड. सागर घरत, प्रशासकीय अधिकारी अनघा पटवर्धन, लेखा अधिकारी शिरीष पालव यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रा. दवणे यांनी “आयुष्य जगण्याची कला” या विषयावरील आपल्या प्रभावी प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मंत्र दिला. दिसतो तो चेहरा आणि प्रतीत होतं ते व्यक्तिमत्त्व असतं. त्यामुळे आपल्या कामावर प्रेम करा, स्वतःला सतत घडवत राहा, स्वतःला शोधा, स्वतःची ओळख निर्माण करा. कसं वागायचं हे दुसऱ्यांकडून शिकण्यापेक्षा स्वतःच्या मूल्यांवर विश्वास ठेवा. दुसरा करो अथवा न करो, मी माझं काम प्रामाणिकपणे करणार या भावनेतूनच खरा आनंद मिळतो,” असेही ते म्हणाले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माळवी यांनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या कामाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहत उत्कृष्टतेचा ध्यास धरावा. आपल्या प्रत्येक कृतीचा, कार्याचा इतरांना कसा फायदा होईल याचा आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक झोपडपट्टी धारकाला हक्काचं घर देण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणे हीच खरी आपल्यासाठी प्रेरणा आहे असे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात समुपदेशक आणि मनोविकास तज्ज्ञ सेजल नातू यांनी “चला, मनाची बॅटरी चार्ज करूया या विषयावर मार्गदर्शन केले. निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम मन निरोगी असणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार, भावनांवर नियंत्रण, आत्मविश्वास आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता यांचा समतोल साधणारे मन म्हणजे निरोगी मन होय, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दैनंदिन जीवनातील धावपळ, कामाचा ताण, नातेसंबंधातील बदल, अपेक्षा आणि अपयश यांचा मनावर होणारा परिणाम समजावून सांगताना त्यांनी मानसिक आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी मनाची बॅटरी चार्ज करण्यासाठी सकारात्मक विचार, नियमित व्यायाम, वाचन, ध्यानधारणा, छंद जोपासणे, कुटुंबीयांसोबत वेळ घालविणे आवश्यक असल्याचे सांगत तणाव हा जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास तो कमी करता येतो, असेही त्यांनी नमूद केले.
जेष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे व समुपदेशक सेजल नातू यांच्या ओघवत्या आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण मार्गदर्शनामुळे उपस्थित अधिकारी-कर्मचारी प्रेरित झाले. सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी कार्यशाळेतील प्रेरणादायी विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक शिल्पा नातू व जनसंपर्क अधिकारी अभिजीत कोतोलीकर यांनी केले.