प्रशिक्षण कार्यशाळा : दिनांक १०/०९/२०२६
नियम व कायद्यांची अद्ययावत माहिती प्रभावी कामकाजासाठी महत्त्वाची : सचिव कल्पना जगताप
एसआरएमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
शासकीय सेवेत कार्यरत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा नियम तसेच संबंधित कायदे व अधिनियमांची अद्ययावत माहिती असणे हे प्रभावी आणि नियमबद्ध कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सचिव कल्पना जगताप यांनी व्यक्त केले.
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ या विषयांवर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये प्राधिकरणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबंधित सेवा नियम व कायद्यांची अद्ययावत माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे दैनंदिन कामकाज अधिक नियमबद्ध, पारदर्शक, गतिमान आणि प्रभावी पद्धतीने करण्यास मदत होणार आहे.
तसेच, प्राधिकरणातील अनुभवी व संबंधित विषयाचे सखोल ज्ञान असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून भविष्यात प्रशिक्षक (ट्रेनर) तयार करून, त्यांच्या माध्यमातून इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची संकल्पना राबविता येईल. प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या ज्ञान व अनुभवाचा प्रभावी उपयोग करून भविष्यात अशा प्रकारची अधिक व्यापक आणि दर्जेदार प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सचिव कल्पना जगताप यांनी नमूद केले.
सदर प्रशिक्षणामध्ये प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांनी संबंधित विषयांवर सादरीकरण करून प्रशिक्षण दिले. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील महत्त्वाच्या तरतुदी, नियम आणि कामकाजाशी संबंधित बाबींची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रशिक्षणामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेला चालना मिळणार आहे. तसेच, प्राधिकरणाचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक, नियमबद्ध आणि परिणामकारक होण्यास या प्रशिक्षणाचा निश्चितच फायदा होणार आहे.